Thursday, September 30, 2010

मानवनिर्मित ग्लोबलवॉर्मिंगची हाळी- एक बुध्दीभेद

मध्यंतरी मी लोकसत्तामध्ये ग्लोबल वॉर्मिंग की सत्यापलाप आणि गैरसोयीची असत्ये असे दोन लेख लिहिले होते. त्यावर बऱ्याच उशीराने पण तीन प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. त्यातील एका प्रतिक्रियेला मी उत्तर दिले होते. ते उत्तर प्रसिध्द झाले त्याच्या शेजारीच डॉ. निकित अभ्यंकर यांची माझ्या लेखावरील दुसरी प्रतिक्रियाही प्रसिध्द झाली. डॉ. निकित अभ्यंकर स्टॅनफोर्ड विद्यापीठात आहेत असे त्यांच्या नावाखाली लिहिले होते. ही प्रतिक्रियाही माझ्या भूमिकेला विरोधी होती. शिवाय त्यात मी बड्या उद्योगांबद्दल काहीही बोलत नाही अशी एक शेरेबाजी होती.
याच स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एक एमिरेटस प्राध्यापक डॉ. जॉन मॅकार्थी हे एकंदर प्रगतीची व्यवहार्यता अतिशय प्रभावीपणे, सांख्यिकी आणि विज्ञान यांच्या आधारावर मांडतात, जगबुडीची हाकाटी करणाऱ्यांच्या एकेक प्रतिवादावर अत्यंत शांतपणे उत्तरे देतात. त्याचे लिखाण, दृष्टीकोन अवश्य समजून घेण्यासारखे आहे. जगाच्या सर्वनाशाची विदारक चित्रे मन लावून रंगवणाऱ्यांच्या फौजेपुढे आपली विवेकबुध्दी ठणठणीत ठेवण्यासाठी या आशावादी विचारवंताची मला तरी फार मदत झाली.
डॉ. गिरिधर पाटील गेल्या पोस्टवरील कॉमेन्टमध्ये म्हणतात- पौर्वात्य भोंगळ तत्वज्ञानाचा संबंध कुठे जोडता येतो कां?
अहो भोंगळपणाचे वैशिष्ट्य पौर्वात्यच काय पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांनाही लागू होते. धार्मिकतेतून निर्माण होणारा गूढवाद हा दोन्हीकडे आहे. आणि साम्यवादी विचारसरणीच्या खांद्यावर उभे रहात भांडवलदारी प्रगतीला विरोध करणारे डावे पर्यावरणवादी, समाजवादी म्हणवून घेणारे दिखाऊ लोक काय कमी भोंगळ तत्त्वज्ञानाची गोळी चढवतात?
आपल्याला एक गोष्ट ठामपणे म्हणता येते ती एवढीच की यात एकंदरीत भोंगळपणा भरपूरच आहे.
आज नीरी, एमटीएसयू आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या मुंबई शहरावरील एका अहवालावर प्रचंड मोठ्या मथळ्यातील बातमी छापून आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा दुष्परिणाम मुंबई शहरावर दिसणार असे त्यात म्हटले आहे.
शहरे ही पृथ्वीवरील मृदा थराची बंदी केल्यामुळे उष्णतेची बेटे होतातच. सारखेच हवामान, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि अंतर असलेल्या, इतर कमी लोकसंख्या, कमी इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या ठिकाणांपेक्षा तुलनेने शहरांतील तपमान जास्तच असते.
नथिंग कम्स फ्री... शहरातील सोयी, जगण्याच्या संधी, वाढण्याच्या संधी हे ज्यांना हवंसं आहे ते ही किंमत देतातच. ज्यांना थंडावा, शांतता जास्त प्रिय आहे त्यांना शहर सोडून इतरत्र रहाता येतंच. हा आपापल्या निवडीचा प्रश्न आहे. माणूस हा आपले पर्यावरण आपल्या गरजेनुसार सुधारत रहातो, बदलवीत रहातो. एकदा शहराची गरज आहे म्हटल्यानंतर त्यात सुखकर वातावरण तयार करण्यासाठी आपण काम करतोच. या शहरात अधिक झाडे लावू, श्वासोछ्श्वास करू शकतील असे रस्ते-पायरस्ते करू, प्रत्येक इमारतीच्या छतावर झाडेझुडुपे लावता यावीत अशा तऱ्हेने इमारतींच्या छतांचे बांधकाम करू...
शहरातील वाढत्या उष्णतेवर उपाय शोधणारे काही लोक म्हणतात इमारतींची छपरे प्रकाश परावर्तित करणारी असावीत... काहीजण म्हणतात प्रकाश परावर्तित करणारे पृष्ठभाग असल्यामुळे उष्णता वाढते.
या विषयावर उलटसुलट चर्चा व्हावी, शास्त्रीय निरिक्षणे घेतली जावीत आणि मग योग्य काय ते ठरवता येईल.
पण नाही, ज्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आरोळी ठोकण्यावर अवलंबून असतो ते सगळे गब्रू पर्यावरणवादी कुठल्याही इश्यूचं कोलीत घेऊन धावत सुटतात. ज्यांना पत्रकारितेत आपली प्रतिमा विशिष्ट प्रकारे घडवून लॉबी चालवायची असते ते त्यांना आणि त्यांच्या इश्यूच्या कोलिताला उंच नेतात.
काही वर्षांपूर्वी मी विद्यापीठात- म्हणजे बहिःशाल शिक्षण विभागात, पर्यावरण आणि विकास अभ्यासक्रम सुरू केला. 1996-97 या वर्षात हा अभ्यासक्रम आखला तेव्हा प्रा. डॉ. एस्. बी. चाफेकर यांनी प्रथमच स्पष्ट केले होते की आपल्याला भयकंपवादी म्हणजे अलार्मिस्ट भूमिका घेऊन पर्यावरण-रक्षणाचा विचार करायचा नाही. आपला परिसर, आपली परिसंस्था सुंदर आणि सुदृढ रहाण्यासाठी असला टोकाचा थयथयाट करण्याची गरज नाही. विशेषतः मुंबई शहर हे शहर आहे, त्याच्या गरजांनुसार त्यातील नैसर्गिक परिसंस्थांचे रक्षण कितपत होते यावर एक मर्यादा येते. यादृष्टीने आपण संतुलित विचार मांडणे आवश्यक आहे.
त्यावेळीही मी म्हटल्याप्रमाणे एक कोलीत-बहाद्दर पर्यावरणवादी होते डॉ. रश्मी मयूर. एकदम इंटरनॅशनल माणूस. (आमच्या विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनी अभ्यासक्रमाच्या आखणीत त्यांना स्थान द्यावे असा आग्रह धरला. जे साध्य करायचे त्यालाच मुळात फांदा मिळाला असता, त्यामुळे तो आग्रह मी जुमानला नव्हता.) साऱ्या पेपरांत एकदम प्रसिद्ध. गेले बिचारे आता. पण त्यांनी मळवलेली पायवाट आता राजमार्ग झाली आहे. फौज वाढली आहे.
दक्षिण मुंबईतले एक साजरं मासिक काढणारे पर्यावरणप्रेमी-वादी आहेत. त्यांच्या तीन कार्स आहेत. एक स्वतःला, एक बायकोला, एक मुलाला... आता यात वावगं काय... काहीच नाही. स्वतःच्या क्षमतेने तुम्ही पैसा कमावला असेल आणि त्यातून तुम्ही तुमच्या सुखकर प्रवासासाठी खर्च केलात तर त्यात वावगं काहीही नाही. पण हे महाशय इतर सर्वांना पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याचा, कार-पूल करून वापरण्याचा सल्ला देतात एवढंच वावगं. दुसरे एक मध्य मुंबईतील वीर  मराठी पत्रकारांचे लाडके झालेत. अणू-ऊर्जा ते सागरी लिंक, ते डहाणूचा कारखाना ते प्रकाश परावर्तित करणाऱ्या काचा ते- अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग सगळ्यावर ते आग पाखड करतात. आणि आपला प्रो-पर्यावरण-फेशनॅलिझम त्यांना आनंदाने वाव देतो.
या साऱ्यामध्ये खरोखरच गाभा आहे तो तत्वज्ञानात्मक गोंधळाचा,  मर्यादित विचारांतून आलेल्या नैतिकतेच्या भोंगळपणाचा. आणि त्याला फूग आली आहे ती या सर्व प्रश्नांमधल्या आर्थिक संधी वाढत गेल्यामुळे, प्रतिष्ठा लाभली आहे ती या निमित्ताने अभ्यासाच्या काही विषयांना वाव मिळून त्यातील पैसा वाढत गेल्यामुळे.
मी आणि माझे अनेक सहकारी गेल्या वीस वर्षांपासून जीववैविध्याचे महत्त्व, वनसंवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना दृष्टी देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम घेत आलो आहोत. पण मानवाच्या विकासामुळे पृथ्वीचे भवितव्य धोक्यात आल्याची हाळी ना आम्हाला कधी पटली ना तिचा वापर करून आम्ही फंड्स मिळवले.
भारतासारख्या देशात तंत्रज्ञान अजूनही लोकांपर्यंत पुरेसे पोहोचले नाही, कल्याणकारी तंत्रविज्ञानात्मक प्रगती इथल्या इथे विकसित झालेली नाही. सकस अन्न आणि स्वच्छ पाणी, जीवनमान सुधारेल इतकी ऊर्जा इथे अनेक लोकांना उपलब्ध नाही. युरोपात पुरेशी समृध्दी आल्यानंतर तिथल्या लोकांनी औद्योगीकरणाच्या नावाने बोंब ठोकणे त्यांना परवडू शकते.  उद्योग किंवा विकास, अणूऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, नवीन बियाणांचा वापर, म्हणजे निसर्गाला गिळणारा राक्षस ठरवून इथल्या लोकांचा बुध्दीभेद करण्याने इथल्या केवळ स्वतःलाच पर्यावरणवादी मानणाऱ्या लोकांना फेलोशिप्स मिळतील, आंतरराष्ट्रीय निधीतून संमेलनांची आमंत्रणे मिळतील, लढाऊ कार्यकर्ते,  झुंजार पत्रकार म्हणून मर्यादित वर्तुळांत मान्यता मिळेल. पण- इथल्या मागास शेतीने पिचलेला शेतकरी, गावात पुरेशी ऊर्जा नाही म्हणून शिक्षण नाही, रोजगार नाही, प्रगती नाही म्हणून जमीन सोडून जाणारे त्याचे लेक-लेकी, या हिणकस प्रचाराची अंतिम बळी ठरतील याचे भान त्यांना असेल?

Tuesday, September 28, 2010

प्रज्ञेच्या अधिक्षेपाविरुध्द

रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह हे आयन रँडचं एक पुस्तक आहे. पर्यावरणवादी चळवळीची नुकतीच सुरुवात झाली होती त्यावेळी आयन रँडने आपल्या इहवादी, वस्तुनिष्ठ, व्यक्तीवादी, भांडवलवादी तत्वज्ञानाच्या अंगाने या विषयावर भाष्य केलं होतं. सध्या मी जे पर्यावरण क्षेत्रातील काही विषयांवर लिहिते आहे त्या दृष्टीनेच हा ब्लॉग सुरू केला आहे.
पर्यावरण रक्षणाबद्दलचा केवळ भावनिक विचार करणाऱ्या चळवळींच्या बाबत त्यांना पुन्हा एकदा मानवाला आदिमतेकडे नेण्यातच जास्त रस आहे की काय असा प्रश्न पडतो. विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान याची फळे स्वतः चाखताना त्यांना काही विशिष्ट मर्यादेवर हा विकास थांबवावा असे वाटते हे तर स्पष्टच आहे. अनेकांना असे वाटते की निसर्गावर प्रेम म्हणजे प्रगतीला विरोध, विकासाला विरोध हा केलाच पाहिजे. आज  ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज मानव निर्मित आहे हे मान्य करणे ही तर परवलीची भूमिका झाली आहे. ही भूमिका घेतली की अनेक दरवाजे उघडतात.
हल्ली शाळा कॉलेजांत विज्ञान प्रदर्शने किंवा आपण आपली जबाबदार नागरिकाची भूमिका निभावतो आहोत हे दाखवण्यासाठी मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची हाकाटी छान सजवून मांडली जाते. विशेषतः लहान मुलांना तर हे अगदी मस्तच पटलेलं आहे. अर्थात या पातळीवर असं काही करत रहाणाऱ्या सर्वांना केवळ प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनपुरती मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची कळकळ रहाते हे एका दृष्टीने बरंय. मात्र जगभरात या हाकाटीच्या छटा फार वेगवेगळ्या आहेत. अल गोर, पचौरी वगैरेंच्या पठडीतल्या लोकांना या हाकाटीमुळे पैसा आणि प्रसिध्दीच्याबरोबरच सत्तालाभही झाला आहे. पण काही भाबडे लोक मात्र या मोहात न सापडता खरोखरच ग्लोबल वॉर्मिंगला मानवनिर्मित कारखानदारी, ऊर्जेचा वापर, इंधन वापर या गोष्टी जबाबदार आहेत असे मानून जगाचा दृष्टीकोन बदलायला निघाले आहेत. कार्बन फूटप्रिन्टचे गणित ताळा-पडताळा न करताच स्वीकारून जगाची भांडवलदारी पध्दतीने होत गेलेली प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करणारे डावे, पर्यायी विकासनीतीचा स्वप्नलोक रंगवणारे कार्यकर्ते लक्षावधी आहेत. संपूर्ण जगाची सत्तासूत्रे एकवटून आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करणारे व्हाईट मेल सुप्रिमसीचे पुरस्कर्तेच यांच्या खांद्यावर बसून अखेर ही विसंगतींनी भरलेली लढाई जिंकून जातील की काय...
विकासाचे मार्ग बदलण्याचे प्रयत्न करताकरता दारिद्र्याचा, दुःखकष्टांचाच मार्ग वाढत्या लोकसंख्येसाठी खुला होणार आहे. तेल नको, अणु ऊर्जा नको, जेनेटिकली मोडिफाईड अन्न नको, प्राण्यांवर प्रयोग करून मिळवलेली औषधे नकोत...
सारे कसे नैसर्गिक हवे. मानवनिर्मित, कृत्रिम असे सारे काही त्याज्य
मानवी प्रगतीच्या प्राथमिक टप्प्यांतले सुंदर( ) जग... स्वप्नलोक...
आदिम जीवनपध्दतीतील साधेपणा, मध्ययुगीन कलात्मकता, अंगमेहनतीचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनपध्दती... या सर्व गोष्टींचे उदात्तीकरण करण्याचे भरधाव प्रयत्न अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था करीत आहेत.
आदिमांचे पुनरागमन करण्याचा हा जागतिक प्रयत्न मान्य नसलेले वैज्ञानिक, विचारवंतही अनेक आहेत. बहुतांश लोकही या प्रयत्नांना केवल मौखिक पाठिंबाच देतात. प्रत्यक्षात साऱ्या मानवनिर्मित सुखसुविधा सर्वांना हव्याच असतात.
मात्र एक गोष्ट यात वाईट होते ती म्हणजे बौध्दिक दुविधा. तुम्ही कपडे घालता पण नागड्या बाबाची पूजा करता. तुम्हाला सकस अन्न हवे असते पण उष्टावळी वेचून जगणाऱ्याला तुम्ही परमपद देता, तुम्हाला कॉम्प्युटरवरून नेटवरचे सारे काही हवे असते पण इहलोकीच्या पलिकडच्या काल्पनिकतेची तुम्ही मंदिरे बांधता.
तुम्हाला शरीराच्या सर्व भुका भागवायच्या असतात, पण तसे न करणाऱ्यांपुढे तुम्ही हात जोडता. अन्न, सेक्स, मौज, यश, ज्ञान या साऱ्या मानवी बुध्दीच्याच गरजा आहेत. त्यांना भागवण्यासाठी तुमची धडपड चालते, पण त्यांना मिथ्थ्या ठरवणे हे तुम्ही संतपदाचे लक्षण ठरवता.
आपली प्रगतबुध्दी मिथ्थ्या ठरवण्याचा हा सापळा कधीतरी नकळत आपल्या पुढे पडणाऱ्या पावलांना अडवू शकतो. अशा व्यक्तींची उदाहरणे तर दिसतातच, पण संपूर्ण समाजच, संपूर्ण जागतिक समाजच त्या सापळ्यात अडकायला नको.
म्हणून आदिमांचे पुनरागमन- रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह- रोखायला हवे.
या प्रयत्नाचा भाग म्हणून मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगच्या कल्पनेच्या विरुध्द, जेनेटिकली मोडिफाईड बीजांच्या विरोधी प्रचारा विरुध्द, अणू ऊर्जेच्या विरुध्द रान उठवणाऱ्यांच्या विरुध्द, आध्यात्मिकतेच्या नावाखाली इहलोकाला तुच्छ ठरवणारांच्या विरुध्द, प्रगतीला चंगळवाद ठरवून  विवेकनिष्ठेलाच आव्हान देणाऱ्यांविरुध्द, आदिमयुगात जाण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान युगाला बदनाम करणाऱ्यांविरुध्द, बुध्दीपेक्षा भावना श्रेष्ठ ठरवून गूढवाद जोपासणाऱ्यांविरुध्द आणि एकंदरीतच  मानवी प्रज्ञेच्या तेजाचा अधिक्षेप करणाऱ्या विचारसरणींविरुध्द मी लिहिणार आहे.
उच्च स्थानी आसनस्थ झालेल्या बकवासाच्या  चिंध्या उडवण्यासाठी मीही लिहिणार आहे.