रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह हे आयन रँडचं एक पुस्तक आहे. पर्यावरणवादी चळवळीची नुकतीच सुरुवात झाली होती त्यावेळी आयन रँडने आपल्या इहवादी, वस्तुनिष्ठ, व्यक्तीवादी, भांडवलवादी तत्वज्ञानाच्या अंगाने या विषयावर भाष्य केलं होतं. सध्या मी जे पर्यावरण क्षेत्रातील काही विषयांवर लिहिते आहे त्या दृष्टीनेच हा ब्लॉग सुरू केला आहे.
पर्यावरण रक्षणाबद्दलचा केवळ भावनिक विचार करणाऱ्या चळवळींच्या बाबत त्यांना पुन्हा एकदा मानवाला आदिमतेकडे नेण्यातच जास्त रस आहे की काय असा प्रश्न पडतो. विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान याची फळे स्वतः चाखताना त्यांना काही विशिष्ट मर्यादेवर हा विकास थांबवावा असे वाटते हे तर स्पष्टच आहे. अनेकांना असे वाटते की निसर्गावर प्रेम म्हणजे प्रगतीला विरोध, विकासाला विरोध हा केलाच पाहिजे. आज ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज मानव निर्मित आहे हे मान्य करणे ही तर परवलीची भूमिका झाली आहे. ही भूमिका घेतली की अनेक दरवाजे उघडतात.
हल्ली शाळा कॉलेजांत विज्ञान प्रदर्शने किंवा आपण आपली जबाबदार नागरिकाची भूमिका निभावतो आहोत हे दाखवण्यासाठी मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची हाकाटी छान सजवून मांडली जाते. विशेषतः लहान मुलांना तर हे अगदी मस्तच पटलेलं आहे. अर्थात या पातळीवर असं काही करत रहाणाऱ्या सर्वांना केवळ प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनपुरती मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची कळकळ रहाते हे एका दृष्टीने बरंय. मात्र जगभरात या हाकाटीच्या छटा फार वेगवेगळ्या आहेत. अल गोर, पचौरी वगैरेंच्या पठडीतल्या लोकांना या हाकाटीमुळे पैसा आणि प्रसिध्दीच्याबरोबरच सत्तालाभही झाला आहे. पण काही भाबडे लोक मात्र या मोहात न सापडता खरोखरच ग्लोबल वॉर्मिंगला मानवनिर्मित कारखानदारी, ऊर्जेचा वापर, इंधन वापर या गोष्टी जबाबदार आहेत असे मानून जगाचा दृष्टीकोन बदलायला निघाले आहेत. कार्बन फूटप्रिन्टचे गणित ताळा-पडताळा न करताच स्वीकारून जगाची भांडवलदारी पध्दतीने होत गेलेली प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करणारे डावे, पर्यायी विकासनीतीचा स्वप्नलोक रंगवणारे कार्यकर्ते लक्षावधी आहेत. संपूर्ण जगाची सत्तासूत्रे एकवटून आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करणारे व्हाईट मेल सुप्रिमसीचे पुरस्कर्तेच यांच्या खांद्यावर बसून अखेर ही विसंगतींनी भरलेली लढाई जिंकून जातील की काय...
विकासाचे मार्ग बदलण्याचे प्रयत्न करताकरता दारिद्र्याचा, दुःखकष्टांचाच मार्ग वाढत्या लोकसंख्येसाठी खुला होणार आहे. तेल नको, अणु ऊर्जा नको, जेनेटिकली मोडिफाईड अन्न नको, प्राण्यांवर प्रयोग करून मिळवलेली औषधे नकोत...
सारे कसे नैसर्गिक हवे. मानवनिर्मित, कृत्रिम असे सारे काही त्याज्य
मानवी प्रगतीच्या प्राथमिक टप्प्यांतले सुंदर( ) जग... स्वप्नलोक...
आदिम जीवनपध्दतीतील साधेपणा, मध्ययुगीन कलात्मकता, अंगमेहनतीचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनपध्दती... या सर्व गोष्टींचे उदात्तीकरण करण्याचे भरधाव प्रयत्न अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था करीत आहेत.
आदिमांचे पुनरागमन करण्याचा हा जागतिक प्रयत्न मान्य नसलेले वैज्ञानिक, विचारवंतही अनेक आहेत. बहुतांश लोकही या प्रयत्नांना केवल मौखिक पाठिंबाच देतात. प्रत्यक्षात साऱ्या मानवनिर्मित सुखसुविधा सर्वांना हव्याच असतात.
मात्र एक गोष्ट यात वाईट होते ती म्हणजे बौध्दिक दुविधा. तुम्ही कपडे घालता पण नागड्या बाबाची पूजा करता. तुम्हाला सकस अन्न हवे असते पण उष्टावळी वेचून जगणाऱ्याला तुम्ही परमपद देता, तुम्हाला कॉम्प्युटरवरून नेटवरचे सारे काही हवे असते पण इहलोकीच्या पलिकडच्या काल्पनिकतेची तुम्ही मंदिरे बांधता.
तुम्हाला शरीराच्या सर्व भुका भागवायच्या असतात, पण तसे न करणाऱ्यांपुढे तुम्ही हात जोडता. अन्न, सेक्स, मौज, यश, ज्ञान या साऱ्या मानवी बुध्दीच्याच गरजा आहेत. त्यांना भागवण्यासाठी तुमची धडपड चालते, पण त्यांना मिथ्थ्या ठरवणे हे तुम्ही संतपदाचे लक्षण ठरवता.
आपली प्रगतबुध्दी मिथ्थ्या ठरवण्याचा हा सापळा कधीतरी नकळत आपल्या पुढे पडणाऱ्या पावलांना अडवू शकतो. अशा व्यक्तींची उदाहरणे तर दिसतातच, पण संपूर्ण समाजच, संपूर्ण जागतिक समाजच त्या सापळ्यात अडकायला नको.
म्हणून आदिमांचे पुनरागमन- रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह- रोखायला हवे.
या प्रयत्नाचा भाग म्हणून मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगच्या कल्पनेच्या विरुध्द, जेनेटिकली मोडिफाईड बीजांच्या विरोधी प्रचारा विरुध्द, अणू ऊर्जेच्या विरुध्द रान उठवणाऱ्यांच्या विरुध्द, आध्यात्मिकतेच्या नावाखाली इहलोकाला तुच्छ ठरवणारांच्या विरुध्द, प्रगतीला चंगळवाद ठरवून विवेकनिष्ठेलाच आव्हान देणाऱ्यांविरुध्द, आदिमयुगात जाण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान युगाला बदनाम करणाऱ्यांविरुध्द, बुध्दीपेक्षा भावना श्रेष्ठ ठरवून गूढवाद जोपासणाऱ्यांविरुध्द आणि एकंदरीतच मानवी प्रज्ञेच्या तेजाचा अधिक्षेप करणाऱ्या विचारसरणींविरुध्द मी लिहिणार आहे.
उच्च स्थानी आसनस्थ झालेल्या बकवासाच्या चिंध्या उडवण्यासाठी मीही लिहिणार आहे.
उच्च स्थानी आसनस्थ झालेल्या बकवासाच्या चिंध्या उडवण्यासाठी मीही लिहिणार आहे.
good begining. best wishes.
ReplyDeleteToo hot. Ekdam tangential. Great job.
ReplyDeleteKeep it up.
Tushar
Thanks, Tushar and Sudhakarji, But I expect you to discuss and write on some of the issues. I hope you will.
ReplyDeleteपौर्वात्य भोंगळ तत्वज्ञानाचा काही संबंध जोडता येतो का ?
ReplyDelete