Monday, October 4, 2010

जीववैविध्याच्या संदर्भात



गेल्या पोस्टवर अरूण इनामदार यांनी जीववैविध्याच्या ऱ्हासाबद्दल कॉमेन्ट केली आहे. मला स्वतःला निसर्गातील जीववैविध्याबद्दल विलक्षण कुतूहल आणि प्रेम आहे. माझ्या बहिःशाल शिक्षण विभागातील अऩेक कार्यक्रमांतून लोकांना आपल्या परिसरातील वनस्पती प्राणी कीटकादी जीववैविध्याची ओळख व्हावी म्हणून मी गेली अनेक वर्षे अनेक कार्यक्रम राबवते आहे, याची आपल्यापैकी काहींना तर निश्चितच जाणीव असेल. हे वैविध्य आपण आपल्या अज्ञानामुळे, गाढवपणामुळे हरपून बसू नये, आपल्या निकटच्या परिसंस्थामध्ये त्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्यासंबंधीची माहिती लोकांना मिळाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो.
या संबंधीचे लोकशिक्षण महत्त्वाचे आहे यात वादच नाही.
प्रश्न येतो तो भयकंपवाद्यांच्या अजेन्डावर जीववैविध्याचा प्रश्न जातो तेव्हा. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे, कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे अनेक जीवजाति-प्रजाती कायमच्या नष्ट होतील असे जे म्हटले जाते, त्यात किती तथ्य आहे ते तपासून पहायला हवे.
जगभरातील वनस्पती, प्राणी, कीटकांच्या प्रजातींपैकी अनेक जाती क्रेटॅशियस आणि टर्शियरी कालखंडाच्या सीमेवर म्हणजे सुमारे 6 कोटी 50 लक्ष वर्षांपूर्वी नष्ट झाल्या होत्या. यातच डायनॉसॉर प्रजातींचाही नाश झाला होता. आज मानवी हस्तक्षेपामुळे जीवजातींचा ऱ्हास याच प्रमाणात होतो आहे असा एक दावा केला जातो. हा दावा नाट्यमय आहे कारण तो वास्तवापेक्षा अतिशयोक्त आहे.
अशा प्रकारे ऱ्हास खरोखरच होतो आहे कां- या प्रश्नाबरोबरच जो काही ऱ्हास होतो आहे, त्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वावर आणि प्रगतीवर काय परिणाम होतात हे पहाणेही महत्त्वाचे आहे.
गेल्या शतकापासून जीवजातींचा ऱ्हास, विशेषतः कीटक प्रजातींचा ऱ्हास होण्याचा वेग वाढला आहे, हे सरसकट मान्य करण्या अगोदर काही मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे. अनेक कीटक प्रजातींचे भूभाग हे फार मर्यादित असतात. उदाहरणार्थ ऍमेझॉनच्या जंगलात अनेक
कीटक प्रजाती आहेत आणि त्यातील अनेक जाती काही एकर भूभागापुरत्याच मर्यादित असतात. त्यामुळे जंगलाचा एखादा भाग जंगलतोड किंवा अन्य कारणांनी नष्ट झाला की त्यातील काही कीटक जाती नष्ट होतात. पण काही कीटक प्रजाती नष्ट झाल्यामुळे जग नष्ट होत नाही. परिसंस्थेत बदल झाल्यानंतर नव्या प्रजाती उत्पन्न होत रहातात. 6 कोटी 50 लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या जीवऱ्हासानंतर पुन्हा एकदा ही वसुंधरा पुन्हा एकदा जीवसृष्टीने गजबजून गेलीच ना...
पृथ्वीच्या अंतर्गत घडामोडींच्या, सूर्यामधील घडामोडींच्या तालावर निसर्गाचे नर्तन चालते. त्यातूनच तो कधी विक्राळ होतो कधी वत्सल. गेली कोट्यवधी वर्षे हे नित्य घडते आहे. एवढ्या ताकदीसमोर मानवी प्रगतीच्या छोट्याशा तरंगाने जो काही बदल होतो आहे तो फार काही नाही. तरीही आपापल्या कणभर आयुष्यकाळात आपण आपल्या परिसंस्था जशा आहेत तशा न राहू देता आपल्या सोयीनुसार त्यात बदल करतोच. डासांची संपूर्ण प्रजातीच नष्ट झाली, ढेकणांची जात ऱ्हास पावली तर आपल्याला हवेच असेल.  
वनस्पती सृष्टीतील जीववैविध्याबाबत बोलायचे तर ज्या वनस्पतींचा उपयोग माहीत आहे त्या वनस्पतींना माणूस जगवतो. आता जगभरच्या अभ्यासकांना आणि त्यांच्या मार्फत लोकांना हे बऱ्याच अंशी माहीत आहे की आज आपल्याला एखाद्या जीवाचा उपयोग माहीत नसला, तरीही तो पुढे कधीतरी माहीत होईल. निदान तोवर तरी त्या आज निरुपयोगी भासणाऱ्या वनस्पतीला टिकवले पाहिजे. जेनेटिक इंजिनियरिंगच्या विरुध्द बोलणाऱ्यांना हे सांगितले पाहिजे की या शास्त्रांच्या प्रगतीमुळे जीववैविध्याचे महत्त्व उद्योगजगतात अधोरेखित झाले आहे. उत्कृष्ट कोटीतील मानवी बुध्दीमत्ता आज या वैविध्याचा शोध घेते आहे. क्रेग व्हेन्टरची संस्था महासागरातील सूक्ष्मातिसूक्ष्म जीवांचा शोध घेत, नोंदी घेत केवढे मोठे कार्य करते आहे. पण या साऱ्याचा हेतू हा मानवजगताची अधिकाधिक प्रगती करणे, निसर्गाच्या विक्राळपणावर मात करण्यासाठी नवे शोध घेणे हाच आहे आणि असायला हवा.
मानवाने केलेल्या आजवरच्या प्रगतीमुळेच मानवजातीला जीववैविध्याचे अस्तित्व आणि महत्त्व अधिकाधिक कळत चालले आहे. या गोष्टी ज्या औद्योगिक क्रांतीमुळे, जैव इंधनांवर आधारलेल्या प्रगतीमुळे शक्य झाल्या त्यांतून काही प्रमाणात परिसंस्थांमध्ये बदल अवश्य झाला. मानवी जीवनाला, वाढीला उपकारक अशा गोष्टी आपण शोधत गेलो,टिकवत गेलो. ज्या गोष्टी आपल्याला काही काळासाठी धोकादायक किंवा निरुपयोगी वाटत होत्या त्यांच्यावर आपण वार केला. अस्तित्वाच्या लढाईत हे होत राहिले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून आज आपण एका सुखकर जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. या वेळी जी प्रगती झाली तिच्यावर थुंकण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे. त्या दृष्टीने जीववैविध्य रक्षणाचा कोणी वापर करीत असेल तर ते ही एक नाटकच आहे हे ओळखायला हवे.
 10 ऑक्टोबर 2010 म्हणजे 10-10-10 या तारखेला मानवजातीने आपल्या कार्बन उत्सर्जानात 10 टक्के घट करावी असे एक आवाहन भावनावादी पर्यावरणवाद्यांनी केले आहे.कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या वातावरणाला धोका पोहोचतो हाच मुळात एक खोटा दावा आहे. वनस्पतींचे वैविध्य आणि संख्या ही कार्बन समृध्द वातावरणात फोफावतात हे अनेक अभ्यासकांनी सिध्द केले आहे. 10:10 नावाच्या एका वेबसाईटवर या दहा टक्के कार्बन-कटच्या संदर्भात गेल्या आठवड्यात एक भयंकर मिनीफिल्म टाकण्यात आली होती. यात कार्बन एमिशन कमी करणे आवश्यक आहे असे सांगणारे लोक आपल्याशी सहमत न होणाऱ्या लोकांना एक बटण दाबून उडवून टाकतात. एक शालेय़ शिक्षिका आपल्या वर्गातल्या न ऐकणाऱ्या मुलांना उडवते, त्यांच्या चिंधड्या उडून साऱ्या वर्गावर रक्तमांसाचा सडा पडतो... ती म्हणते नो प्रेशर- असे आणखी चार पाच गट दाखवून त्यातल्या विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना बटण दाबून उडवून टाकलेली रक्तरंजित अभद्र दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
ही म्हणे विनोदी फिल्म होती...
भावनेचे राजकारण करणाऱ्या पर्यावरण चळवळीची मजल कुठवर गेली आहे ते पाहून ठेवा.









1 comment:

  1. Although we all know that scientific advancements have helped us realize and study the changes around us, loss of biodiversity issue needs to be addressed going beyond the homocentric considerations. The issues here are those of ethics (an emotional one: can I destroy life I cannot create?) and of the 'precautionery principle'(Agreed upon during the Rio summit: we should not destroy anything that we do not know fully about). The powerful position man, as a species, has acquired on the earth, also has responsibilities.. like, as a family head (Vasudhaiv Kutumbakam!)our conscience doesn't allow us to sacrifice our defenseless family members for our convenience /enjoyment, unless we want to be branded as modern day Nazis/..! We need not totally get carried by the alarmist' views, but we cannot totally brush aside these considerations too!

    ReplyDelete