Tuesday, October 5, 2010

आता कास खतरेमें

सातारा जिल्ह्यातील कास येथील पुष्पपठार गेल्या काही वर्षात अचानक खूप पॉप्युलर झाले. त्या आधी काही मोजक्याच निसर्गभ्रमन्ती करणाऱ्यांना त्याची माहिती होती. डिजिटल कॅमेरे, ऑर्कुट, फेसबुक यांच बरोबर वृत्तपत्रांची रंगीत छायाचित्रे छापून पेपर आकर्षक करण्याची गरज यातून कासच्या वेड्यागत फुलणाऱ्या पठाराला भरपूर प्रसिध्दी मिळाली. हे पठार फुलण्याचा काळ जेमतेम महिना सव्वा महिना इतकाच आहे. ही माहिती मिळाल्यावर तिथे जाणारे पर्यटक छोट्याशा कालखंडात मोठ्या संख्येने गेले.
मी स्वतः या वर्षी पंधरा दिवसांच्या गॅपने तिथे दोनदा गेले. दोन्ही वेळा वीकेन्ड असूनही तिथली गर्दी अशी काही वाहवून चालली नव्हती. कर्णकर्कश भोंगे लावून नाच करणारी जनता तिथे पोहोचली नव्हती. पेपरात आलेली माहिती वाचून, फोटो पाहून भुललेले, फुललेल्या बहराचा आनंद घेण्यासाठी, ते सौंदर्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवण्यासाठी वेळात वेळ काढून धावलेले मुंबई-पुण्याकडचे लोक होते ते...
महिन्याभरापूर्वी ज्या लोकांनी कास पठारावर वृत्तपत्रांमधून लेख लिहिले, फोटो पाठवले (त्यासाठी मानधनही मिळतंच) तेच लोक अचानक आता गर्दी होत असल्यामुळे कासचे पुष्पपठार खतरेमें ची बोंब ठोकताना पाहून मजा वाटते. 
अचानक त्यांना कासला काटेरी कुंपण घालण्याची गरज वाटू लागली आहे.
गर्दीला आवर घालण्याची गरज वाटू लागली आहे.
कासचे किंवा अशा कुठल्याही रानोमाळ सौंदर्याचे रक्षण करण्याचे काही मार्ग आहेत. लोकांना फिरण्यासाठी दगडी फरशांच्या पायवाटा करणे, त्यांच्यासाठी काही बेसिक सुविधा पुरविणे हे केले की लोक फुलं कशाला तुडवतील... आपण सोडून बाकी सारे नासधूसच करतील असा ग्रह नको.
आलेल्या पर्यटकांची प्रवेशशुल्कही द्यायची तयारी असते. ते घेऊन शिस्त आणि सुविधा दोन्ही साध्य करता येईल. ते न करता केवळ वृत्तपत्रांतून कास पठार रक्षणाची हाळी देत सर्वसामान्य लोकांना कासचा प्रवेश बंद करून नेमके काय साध्य होणार...  

No comments:

Post a Comment